'संघटन' म्हणजे नक्की काय???
'संघटन' म्हणजे नक्की काय??? संघटन म्हणजे सामुदायिक एकत्रिकरणातून समाजाची नीतीमुल्ये,बांधिलकी जपत केलेले सार्वत्रिक कार्य होय... राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये संघटनेचे महत्व व्यापकतेने विषद केले आहे.ते म्हणतात, "हत्तीस आवरी गवती दोर। मुंग्याही सर्पास करती जर्जर।। रानकुत्रे संघटोनी हुशार। व्याघ्रसिंहासी फाडती।।"
यावरुन समाजजीवनात संघटनेचे महत्त्व किती मोठे आहे हे आपण समजू शकतो. संघटन हे कृतीशील जीवनाचे द्योतक आहे. इतकेच काय तर मानवी जीवन प्रवाहित करण्याचे ते एक साधन आहे. मानवी इतिहास सुद्धा संघटनेच्या नैतिक आधारावरच लिहिला गेला आहे. मानवी उत्कर्षाच्या काळात संघटन हेच मानवी विकासाला प्रेरणा देणारे संजीवन ठरले होते. मानवी विकासाचा, उत्कर्षाचा, संघर्षाचा, यशाचा, धेयप्राप्तीचा, विजयाचा इतिहास संघटनातूनच लिहिला गेला आहे. हे नाकारता येत नाही.
आपण एखादे मोठ्यातले-मोठे काम पण संघटनेच्या माध्यमातून किती नेटकेपणाने करू शकतो,याची अनेक उदाहरणे आपण पाहत असतो.गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये "पानी फौंडेशन" या सामाजिक संस्थेने संघटनातून केलेले काम अन त्यातून झालेली जलक्रांती आपण सर्वांनी पाहिलीच आहे.
मनुष्य हा समाजशील प्राणी आहे असे म्हणतात.समाजात समूहाने राहूनच मानवाचा सर्वांगीण विकास होत असतो. त्याच्या व्यक्तीमत्वाला नानाविध कंगोरे फुटून त्याचे व्यक्तिमत्त्व बहरत असते. जो माणूस समाजशील नसतो तो कितीही बुद्धिवान,पैसेवान असला तरी एका विशिष्ट मर्यादेच्या पलिकडे समाजाला त्याचा उपयोग होत नाही.
म्हणूनच प्रत्येकाच्या जीवनात संघटनेचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे.अन हेच संघटन जर काळानुरुप मोठे होत गेले,तर आपोआपच संघटनाच्या माध्यमातून होणारे सामाजिक कार्य पण वृद्धिंगत होत जाते.
इतिहासातील याच संघटनात्मक सामाजिक कार्याचा वसा घेतंच आपण "श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान,महाराष्ट्र" या सामााजिक संस्थेची स्थापना केलेली आहे... त्या माध्यमातून आपण पवार परिवारातील सदस्यांना एकत्र आणत आपल्या इतिहास अन संस्कृतीचे दर्शन घडवून देत आहोत.
संघटनेच्या माध्यमातून समाजातील गरजवंतांना कृषी,सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक, व्यावसायिक अश्या विविध कार्यक्षेत्रात काम करण्यास योग्य दिशा देणे,सामूहिक मदत करणे,नवनवीन योजनांची माहिती करून देणे,विचारविनिमयांतून अडचणी दूर करणे. हाच संस्थेचा मूळ उद्देश आहे...
आणि आपल्या परिवारातील सदस्यांचा एकात्मिक विकास साधण्यासाठी या संस्थेद्वारे आम्ही सदैव कार्यतत्पर राहू...
आपल्या संघटनेत, -आग्रह नाही,आदर आहे. -संपर्क नाही,संबंध आहेत. -अर्पण नाही,समर्पण आहे. -सूचना नाही,समजूतदारपणा आहे. -कायदा नाही,सुव्यवस्था आहे. -भीती नाही,भरोसा आहे. -शोषण नाही,पोषण आहे. चला सगळे जागे होऊ,संघटनाचे धागे होऊ।।





आपली टिप्पणी जोडा